Star VCM न्युज :-
चंद्रपूर :-
लंडन, दि. ४: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक करोड कोहिनूर ओवाळून टाकावे असा राजा होय. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात येते, क्रुरता आपली सिमा ओलांडते तेव्हा एक तर देव अवतार घेतो किंवा शिवबा अवतार घेतात;
छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव जरी नसतील तरीही देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत, या महानायकाचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमित उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, तुम्ही पुढाकार घ्या मी पुतळा देईन अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.
विजापूरचा मुगल सरदार अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी महाराजांनी बाहेर काढला ती वाघनखे परत मिळविण्यासाठी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी यशस्वी करार केल्यानंतर ना. मुनगंटीवार यांचा लंडनच्या स्थानिक मराठी बांधवांनी भव्य समारंभ आयोजित करुन सत्कार केला. या सोहळ्यात ते बोलत होते.
ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, मला जेव्हा सूचना केली की लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर पुतळा उभा करावा, तेव्हा मला अतिशय आनंद झाला; मी लगेच संमती दिली. यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने तुमच्या पाठिशी उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी विचार विश्वात पोहचावा अशी आमची अपेक्षा आहे. हा विचार जगातील प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, तालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंत, गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक आई-बहिणी पर्यंत, पोहचविण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाने केला आहॆ. यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.
लंडनच्या मराठी बांधवांचे आभार मानताना ना. मुनगंटीवार म्हणाले,
आयुष्यामध्ये अनेक आनंदाचे क्षण येतात त्यापैकी आजचा एक आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांची भेट घेताना, तुमच्याशी संवाद साधताना, तुमचं दर्शन घेताना मलाही मनापासून आनंद होतोय. जगातील १९३ देशात देशांत सर्वांत श्रेष्ठ भारत असून त्यात आमचा महाराष्ट्र महान आहे .
ते म्हणाले मी भाग्यवान आहे, सांस्कृतिक मंत्री म्हणून शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली. हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या अफजलखानाची कंबर उखडून टाकण्याचे सौभाग्य मला मिळाले; त्याचे उदात्तीकरण आम्ही सहन करु शकत नाही. आग्र्याच्या किल्यात जेथे महाराजांचा अपमान झाला तेथेच भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करुन अभिवादन केले, राज्यात ठीकठिकाणी जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग असे कितीतरी उपक्रम राबविण्याची संधी मिळाली. आमचा राजा शूर होता, वीर होता, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक होता; त्यामुळे मराठी मातीशी नाळ जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त शिवबाच असावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामंजस्य करार करण्यास ना. सुधीर मुनगंटीवार लंडनला येणार हे कळल्यापासूनच स्थानिक शिवप्रेमी मराठी बांधव उत्साहित होते. मंगळवारी दुपारी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्तुझियम जवळ ना. मुनगंटीवार पोहोचताच पारंपरिक मराठमोळ्या वेषात, ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत या महाराष्ट्र मंडळाने केले. सामंजस्य करार झाल्यानंतर अतिशय देखणा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला; स्फुर्तीगीत, पोवाडा, पारंपरिक नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग अशा विविध छटांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.