*एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचा संयुक्त पुढाकार*
________________________
एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर आणि खादी व ग्रामोद्योग आयोग, विभागीय कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनात दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी तीन दिवसीय ‘मधुमक्षिका पालन प्रशिक्षण’ शिबिराचे उद्घाटन महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे पार पडले.
ग्रामीण महिला आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या कसे स्वावलंबी बनतील यासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ नेहमी अग्रेसर असते. विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा सोबतच कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे आणि उद्योग क्षेत्रात महिलांचा वाटा कसा वाढवता येईल हा यामागचा उद्देश आहे, यामुळे ग्रामीण महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महर्षी कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांची उपस्थिती होती. सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे जिल्हा समन्वयक विजय ठाकरे, मुख्य प्रशिक्षक प्रशांत सावंत आणि अनिता कासार यावेळी सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ठाकरे यांनी केले यावेळी मधुमक्षिका पालन मुळे होणारे लाभ आणि खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी सर्वांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी विद्यापीठात आयोजित वेगवेगळ्या उपक्रमाबाबत सर्वांना अवगत केले सोबतच महिलांच्या सक्षमकरणासाठी विद्यापीठ आपल्या गावी येतोय. विविध कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
तीन दिवस चालणाऱ्या या मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक निर्भरतेचे धडे मिळणार आहे. मधुमक्षिका पालन करण्याचे फायदे सांगितले जाणार आहे. प्रात्यक्षिकच्या व विविध सादरीकरण च्या माध्यमातून हे प्रशिक्षण पार पडणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण यातून नक्कीच होईल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले, सदर कार्यक्रमात विद्यापीठाच्या विद्यार्थिनी समवेत परिसरातील ग्रामीण महिलांची उपस्थिती आहे. अनेक ग्रामीण महिलांनी या प्रशिक्षण साठी नाव नोंदणी केली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापन पार पाडण्यासाठी आवारातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.