Chandrapur : राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रप्रेम आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. तेव्हा या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण यांसारखे उपक्रम सातत्याने राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येऊ शकते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांनी येथे बोलताना केले.गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय ‘प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी वार्षिक नियोजन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे होते. त्यावेळी अध्यक्ष भाषणातून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, सिनेट सदस्य संजय रामगिरवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड हे प्रामुख्याने उपस्थित होते.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीच्या दिशेने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने व्यापक लोकजागृती अभियान हाती घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम राबविणारी योजना नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सेवाभाव निर्माण करणारी चळवळ असल्याचे सांगितले. गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र रासेयो ‘ओपन युनिट’ सुरू करण्यात यावे, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल आणि समाजाभिमुख उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की यांनी केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समितीचे प्रस्तावक तथा सिनेट सदस्य संजय रामगिरवार यांनी ‘चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मोहीम आणि वृक्षारोपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.द्वितीय सत्रात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक डॉ. गुरुदास बल्की आणि गडचिरोली जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप चापले यांनी अनुदान वितरण, अंकेक्षण व प्रलेखे अहवाल, स्वयंसेवक नोंदणी, विशेष शिबिरांचे आयोजन तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेत आगामी शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांचे नियोजन, विशेष निवासी शिबिरे, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि विद्यार्थी विकास यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाला विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम माहोरे यांनी केले.या कार्यशाळेला यशस्वी करण्याकरिता हनुमंत डंबारे, राजेश इंगोले, दर्शन मेश्राम, गौरव झाडे, शालिनी निर्मलकर तसेच रसेयोचे स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.



