जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस व आरटीओना निर्देश
चंद्रपूर, दि. 5 : वाहनांच्या काचावर ब्लॅक फिल्म लावून सदर वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या खिडक्या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे.
वाहन उत्पादकाने वाहनाच्या उत्पादन स्तरावर मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 100 मध्ये विहित केल्याप्रमाणे 70 टक्के व 50 टक्के असणाऱ्या काचा पुढील व मागील विंडस्क्रीन व साईडच्या खिडक्यांना बसविणे आवश्यक आहे. एकदा वाहन नोंदणी झाल्यानंतर वाहनाच्या विंडस्क्रीन अथवा खिडक्यांच्या काचावर कोणतीही ब्लॅक फिल्म अथवा पेंट करता येणार नाही, जेणेकरून खिडक्यांच्या पारदर्शकतेस अडथळा होईल.
याबाबत सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, ज्या वाहनांच्या खिडक्या आणि विंडस्क्रीनला ब्लॅक फिल्म लावले आहे, त्यांनी तात्काळ आपल्या वाहनावरून ब्लॅक फिल्म, पेंट किंवा इतर स्टिकर वगैरे तात्काळ काढून टाकावे. तपासणी दरम्यान अशा प्रकारचे वाहन रस्त्यावर आढळल्यास या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कार्यरत अधिकाऱ्याकडून त्याच ठिकाणी वाहनावर असलेली ब्लॅकफिल्म काढण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.