Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

बैठक घेत यांचे मनपा प्रशासनाला निर्देश चंद्रपूर: सफाई कर्मचार्यांसाठी राज्य सरकारने राबविलेल्या ‘श्रमसाफल्य’ योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत. मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्तम नियोजन करत सफाई कामगारांना सदर योजना अंतर्गत हक्काची घरे मिळण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचनाही मनपा आयुक्त विपिन परिवाल यांना दिल्या आहे. आज शुक्रवारी मनपा कार्यालयात आयोजित या बैठकीला चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, अखिल भारतीय सफाई मजदूर काॅंग्रेसच संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष गोविंद परमार, विक्की बढेल, धनश्याम डकाह, जितु मस्ते, मनोज खोटे, राजेश रेवते, राजेश उसरे, गिरिश शुक्ला, राजू राठोड, रेखा गौतम, मधू बिरिया, संजय बिरिया, सिमा जव्हेर, यंग चांदा ब्रिगेडचे देवा कुंटा, विलास सोमलवार, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, कार्तिक बोरेवार, संजय महाकालीवार आदी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘श्रम साफल्य’ घरकुल योजनेची माहिती देताना सांगितले की, राज्यातील महानगरपालिका किंवा नगरपालिका सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्यांची सेवा 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे, अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास, निधनानंतर त्यांच्या पात्र वारसांना महानगरपालिकेकडून मालकी हक्काची सदनिका मोफत वाटप करण्यात येतात. सदर सदनिकांचे बांधकाम शासनाकडून स्वतंत्रपणे करण्यात येते. ही योजना सफाई कामगारांसाठी महत्त्वाची असल्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणी तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेला गती देणे, लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवणे, आणि योजनांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.”कोणतीही योजना प्रभावी होण्यासाठी, लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सदर योजनेसह इतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रभाग पातळीवर कार्यशाळा, शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही लोकउपयोगी योजना पोहोचण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना एकत्रित काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. “श्रमिकांच्या कल्याणासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दिशेने काम करण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले आहेत. या बैठकीला सफाई कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share.

Leave A Reply

Exit mobile version