चंद्रपूर, दि. 5 : बाल न्याय मंडळ व बालकल्याण समिती, चंद्रपूर येथील कार्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित विजयकुमार जोशी, बाल न्याय मंडळाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी सीमा लाडसे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या मनीषा नखाते, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा धर्मपुरीवार व इतर सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
विधी सेवा चिकित्सालयामार्फत न्याय मंडळाकडे चालवल्या जाणाऱ्या खटल्यांमधील बालकांना जर मोफत विधी सेवा व सहाय्य हवे असेल तर ते पुरवले जाईल. बऱ्याच वेळा अशा बालकांकडे आर्थिक अडचणीमुळे वकील उपलब्ध होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत उपरोक्त विधी सेवा चिकित्सालयामार्फत मोफत वकील मिळावा, यासाठी अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तो जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्याकडे सादर केला जाईल आणि संबधितास मोफत वकील दिले जातील. सदर चिकित्सालयामध्ये श्रीकांत कवटलवार व निशा गेडाम हे अधिवक्ता काम पाहणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
००००००