Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

तहसीलदारांनी रद्द केलेल्या आदेशाला एसडीओंची मंजुरी

नवरगावच्या सरपंचाकडून स्वार्थापोटी रस्ता मंजुरीत आडकाठी : राजू भैसारे यांचा आरोप

चंद्रपूर : जमीन विकासक राजू भैसारे यांनी नवरगाव सीमेवर रत्नापूर नझूल हद्दीत शेतजमीन खरेदी केली. या शेतजमिनीवर त्यांनी लेआऊट टाकले. या लेआऊटला महसूल विभागाने मंजुरी दिली. त्यामोबदल्यात त्याचे शुल्कही त्यांनी भरले. परंतु, लेआऊटमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्ता देण्याबाबत त्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. यानंतर त्यांना नायब तहसीलदार यांनी रस्ताही मंजूर केला होता. परंतु, नवरगावचे सरपंच राहुल बोडणे यांनी दबावातून तहसीलदारांना हा आदेश रद्द करण्यास भाग पाडले. दरम्यान, तहसीलदाराच्या या आदेशाविरोधात एसडीओंकडे अपिल केल्यानंतर एसडीओंनी तहसीलदारांनी रद्द केलेला आदेश फेटाळत नायब तहसीलदारांचा आदेश कायम ठेवत रस्त्याला मंजुरी दिली आहे. यानंतरही सरपंच बोडणे वैयक्तीक स्वार्थापोटी रस्त्याच्या मंजुरीत आडकाठी आणत असल्याचा आरोप राजू भैसारे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भैसारे यांनी नवरगावच्या सीमेवर शेती घेऊन लेआऊट टाकले. या लेआऊटमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर सर्व्हे क्रमांक १९ या झुडपी जंगलातून रस्ता मंजूर करण्यात आला. तसे आदेशही तहसीलदार यांनी पारीत केले. पंरतु, सरपंच बोडणे यांनी सदर जागा ही नवरगाव ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याचे सांगून तसेच राजकीय दबावतंत्राचा वापर करून तहसीलदारांमार्फत रस्ता मंजुरीचा पारीत केेलेला आदेश रद्द करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे आतापर्यंत बोडणे सदर जागा ग्रा.पं.मालकीची असल्याचे सांगत होते. तसा फलकही त्यांनी लावला होता. मात्र, त्यांनीच आता सदर जागा शासकीय असल्याचे सांगत असल्याने त्यांच्या भूमिका बदलण्यावर भैसारेनी संशय व्यक्त केला आहे.

तर, तहसीलदाराच्या आदेशाविरुद्ध भैसारे यांनी एसडीओंकडे अपिल करून, न्याय मागितला. एसडीओंनी तहसीलदारांचा रस्ता मंजुरी रद्दचा आदेश फेटाळत जुनाच आदेश कायम ठेवला आहे. ही बोडणे यांना मोठी चपराक असतानाही ते वैयक्तीक द्वेषातून लेआऊटच्या रस्त्याला विरोध करीत आहे. त्यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती, असा आरोप आपण यापूर्वीच केला होता, यावर आपण आजही ठाम असून, त्यांनी दिलेले नार्को टेस्टचे आव्हान आपण स्वीकारत आहोत. बोडणे यांनीही स्वतं:ची नार्को टेस्ट करून घ्यावी म्हणजे सत्य काय ते जनतेपुढे येईल, असे आव्हान त्यांनी बोडणे यांना दिले. आपला लढा हा केवळ बोडणेविरुद्ध आहे. नवरगाव किंवा परिसरातील कोणत्याही ग्रामपंचायतींशी नाही. मात्र, बोडणे स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी काही ग्रामस्थांना आणि सरपंच संघटनेला पुढे करून आपुलकी मिळवित आहे, असेही भैसारे यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे नायब तहसीलदारांनी रस्त्यासाठी मंजूर केलेली जागा मुख्य महामार्गापासून केवळ ४० मीटर आहे. यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही, असे असताना येथे शासकीय निधीतून तलाठी कार्यालय बांधण्याचा घाट घातला जात आहे. हे अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोपही त्यांनी केले. वास्तविक मी खरेदी केेलेल्या जमिनीवर बोडणे यांचा डोळा होता. त्यांना ती जमीन स्वस्तात खरेदी करायची होती. परंतु, त्याना यश आले नाही, त्यामुळे तेे दुसऱ्याच्या कामात आडकाडी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Share.

Leave A Reply

Exit mobile version