Contact : +91-8888856748
Mail: info@starvcmnews.com
Contact : +91-8888856748

चंद्रपूर, दि. 25 : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे राहणार आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकींग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन दिवस व कार्यालयीन वेळेत सदर गॅझेटिअर नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील. गॅझेटिअर पाहून नागरिकांना याबाबत योग्य सुचना व अभिप्राय नोंदवायचा असेल तर रजिस्टरमध्ये तशी नोंद करावी. योग्य अभिप्राय व सुचनांचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला जिल्हाधिक-यांसह गॅझेटिअर संपादक मंडळाचे सदस्य अशोक सिंह ठाकूर, कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर आणि उपसंपादक प्र.रा. गवळी उपस्थित होते.
नागरिकांच्या योग्य सुचना व अभिप्रायसाठी 1 महिना जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध

Share.

Leave A Reply

Exit mobile version